Sunday, December 23, 2007

कोल्हापुरी मिसळ

तसा माझा आणि तिखट जेवणाचा अजिबात संबंध नाही. माझा जन्म कोल्हापुरचा, तसेच मी ११ वर्ष पण कोल्हापुर मधे काढली पण तरीही तिखट जेवण मला काही पचत नाही. मी आपला वरण भात prefer करणारा. पण काल एकदम झणझणीत मिसळ खायचा mood झाला. मग काय, मिनोतीच्या ब्लॉग वरुन ही कृती उचलली आणि लागलो तयारीला!

आहाहा! झणझणीत कोल्हापुरी मिसळ! तूम्हालाही इच्छा झाली तर कृती इथे दिली आहे.

ही कृती मी मिनोतीच्या ब्लॉग वरून ढापली आहे! (पण फोटो नाही ढापलेला).

मटकीची उसळ -
४ वाट्या मोड आलेली मटकी
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ टेबल्स्पून तेल - फोडणीसाठी कढीलिंब आणि इतर फोडणीचे साहित्य
२ लहान लसुण पाकळ्या (आवडत असतील तर)
कांदा-लसुण मसाला - २ चमचे (आवडीप्रमाणे कमी जास्त करावे)
चवीप्रमाणे मीठ
थोडेसे पाणी - मटकी शिजवण्यापुरते

कृती - तेलाची नेहेमीप्रमाणे कढिलिंब घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यातच लसुण पाकळ्या ठेचुन टाकाव्यात. त्यावर चिरलेला कांदा मध्यम आचेवर परतवुन घ्यावा. त्यात मटकी घालुन ती पण नीट परतुन घ्यावी. त्यावर आता कांदा-लसुण मसाला, मीठ घालुन परतावे. साधरण १/२ कप पाणी घालुन झाकण ठेवुन मटकीची उसळ शिजवुन घ्यावी.

मिसळीचा कट -
२ मोठे लाल कांदे पातळ उभे चिरुन
२ चमचे लाल तिखट (लाल रंगाचे पण खुप तिखट नसलेले ब्याडगीचे वापरणार असाल तर २ चमचे अन्यथा चवीप्रमाणे कमी करावे)
चवीपमाणे मीठ
२ चमचे गरम मसाला
२ टेबल्स्पून कोरडे खोबरे
२ टेबलस्पून ओले खोबरे
३ टेबल्स्पून तेल
५-६ लसुण पाकळ्या
१/२ इंच आले
१/२ वाटी कोथिंबीर

कृती - १ चमचा तेल जाड बुडाच्या कढईत घालुन त्यावर कापलेल्यापैकी २/३ कांदा मंद आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतुन घ्यावा. त्यातच आल्याचे तुकडे, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, दोनही प्रकारचे खोबरे घालुन अजुन साधारण ३-४ मिनीटे परतुन घ्यावे. परतत असताना काहीही जळणार नाही ह्याची काळजी घ्यावी. थोडावेळ थंड करुन कमीत कमी पाणी वापरुन मसाला वाटुन घ्यावा. आता उरलेला कांदा २ चमचे तेलात फोडणी करुन परतुन घ्यावा. त्यावर लाल तिखट घालुन परतावे. तिखट घालुन परतताना घराच्या खिडक्या दारे उघडायला विसरु नये. त्यावर वाटलेला मसाला घालुन साधरण ५-७ मिनीटे व्यवस्थीत परतुन घ्यावे. त्यात गरम मसाला आणि मीठ घालुन साधरण ५-६ कप पाणी घालावे. गॅस बारीक करुन झाकण न ठेवता कट नीट उकळु द्यावा. असे केल्याने तेलाचा तवंग नीट येतो अगदी कमी तेल घातले तरी. उकळताना पाणी अटेल त्यापमाणे जस्ती घालावे. तयार कट ५-६ कप असावा.

मिसळीसाठी लागणारे इतर साहीत्य -
२ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन चिरुन
५-६ वाट्या फ़रसाण
१/२ वाटी कोथिंबीर
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ लिंबु फोडी करुन
६-८ ब्रेड स्लाईसेस

वाढण्याची रीत - एका पसरट बाऊल मधे साधरण १/२ कप उसळ घालावी. त्यावर १/२ कप फ़रसाण, त्यावर ५-६ बटाट्याच्या फोडी, साधारण १/२ कप कट, चमचाभर कांदा, चमचाभर कोथिंबीर घालावे. बरोबर २ ब्रेड स्लाईस आणि लिंबु द्यावे. खुप सारे Tissue papers द्यायला ही विसरु नये!!

टीप - हा पदार्थ खाउन कुणाला त्रास झाला तर मी जबाबदार नाही!!

Saturday, November 10, 2007

तूम्हाला बारीक व्हायच आहे?

क्षणभर विचार करा की एखाद्या ठिकाणी तूम्हाला दिवाळीच्या पार्टीला बोलावले आहे. १ मोठ्ठा हॉल आहे. त्या हॉल मधे ५-५० लोक आहेत. तूम्ही प्रवेश करता. टेबलवर "भेळ, गाजराचा हलवा, बुंदीचे लाडू, सामोसे, तळलेले काजू, काजू कतली, केळ्याचे वेफ़र्स" आणि असेच बरेच पदार्थ आहेत. तूम्ही त्यावर अगदी आडवा हात मारता. आत्मा शांत झाल्यावर एखाद्या "व्यक्ती" बरोबर गप्पा मारत बाहेर पडता आणि त्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला विचारते, "तूला बारीक व्हायच आहे"? मंडळी, काय उत्तर द्याल हो? असच काहीतरी माझ्या बाबतीत काल घडलं.

काल माझ्या ऑफ़ीस मधे दिवाळी ची पार्टी होती. काही हौशी लोक बरेच दिवस या पार्टीचे आयोजन करत होते आणि २ दिवसापुर्वी माझ्या कंपनीने हा event sponser करायचं ठरवल. वर सांगीतल्या प्रमाणे "भेळ, गाजराचा हलवा, बुंदीचे लाडू, सामोसे, तळलेले काजू, काजू कतली, केळ्याचे वेफ़र्स" असे बरेच पदार्थ होते. या सर्व पदार्थांवर ताव मारुन झाल्यावर बरेच दिवस मी टाळत असलेल्या व्यक्तीशी गाठ पडली.

म्हणजे "ते" पात्र तसं खासच आहे. तूम्ही "तरुण तुर्क म्हातारे अर्क" पाहीलं आहे का? आहे ना, तर त्यातला "कुंदा भागवत" आहे ना तशी "त्या"ची बोलायची style. आणि व्यक्तीमत्व तर काय, एक अत्यंत घट्ट fitting चा शर्ट. त्यातून बाजूला डोकावणारे त्याचे काकडी सारखे biceps आणि पुढे आलेले पोट. आणि त्यावर त्याचे लाजत, मुरकत बोलणं. विलक्षण योग होत तो.

तर माझा फ़राळ आटपून मी "त्या" व्यक्तीबरोबर बाहेर पडलो आणि त्याने bouncer टाकला, "तूला बारीक व्हायचं आहे का रे सखा"? मी आडवाच झालो. तरीही धीर धरुन मी म्हंटल हो. तो म्हणाला, "सोप्प आहे, काळे कपडे वापर". "काळे कपडे?" इती मी. आणि त्यावर त्याचं छोटं व्याख्यान झालं. "अरे तूला माहीती आहे का, मी ना आज काळा शर्ट घातलाय ना. मला सकाळ पासून सगळे म्हणत आहेत की मी बारीक झालो आहे. अरे आत्ता तर फ़राळ करताना "ती" गोरी मुलगी म्हणाली (इथे त्याचे लाजणे) की मी ५ pound वजन कमी केल्यासारखा दिसतोय. अरे याचं सोप्प कारण आहे. आपण काळे कपडे घातले ना की आपण बारीक दिसतो. तूही घालत जा काळे कपडे. तूला उपयोगी पडेल. माझ्यावर विश्वास नसेल ना तर गुगल कर".

एवढं म्हणून "ती" व्यक्ती निघून गेली. मनात आलं, "खरचं, असं असेल का?" घरी येउन गुगल केलं तर खरचं विश्वास बसेना. ही लिंक वाचा मित्रहो!

मला बारीक दिसायचं आहे हो (व्हायचं नाही आहे फ़क्त दिसायचं आहे)
(हि लिंक नाही access करता आली तर मला email कर. माझ्या Favorites मधे आहे, पाठवेन email ने)

अशी बरीच articles आहेत गुगल वर. Gym ला जाणं मला काही जमत नाही. या विकेंडला एकच काम, चांगले काळे शर्ट विकत घ्यायचे!

Saturday, November 3, 2007

तरुण तुर्क म्हातारे अर्क

आज प्रथमच ब्लॉग लिहितोय. Actually मी ३ आठवड्या पुर्वी ब्लॉग लिहायचा प्रयत्न केला होता. त्याला कारणही तसचं होतं. त्या दिवशी रविवार होता आणि नेहमी प्रमाणे संजय पाचपांडेच्या घरी आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो होतो. हो, मी नाटकं करतो. म्हणजे, मी नाटकात काम करतो. तर सांगायचा मुद्दा हा की मी नेहमी प्रमाणे नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो आणि तिथे मिनोतीशी गप्पा मारत होतो. गप्पा मारताना समजलं की आपण मराठीत ब्लॉग लिहू शकतो. तशी ब्लॉग लिहायची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती पण ईंग्लीश मधे लिहिणं “is not my cup of tea”. म्हणतात ना सरड्याची धाव कुंपणा पर्यंत त्याप्रमाणे माझे ईंग्रजी वरचे प्रभुत्व म्हणजे मराठी मध्ये १/२ ईंग्रजी म्हणी वापरण्या पर्यंत. पण तरीही ब्लॉग्स्पॉट वर लिहायच्या ऎवजी मी गुगलपेजेस वर ब्लॉग लिहिला. शेवटी आज समजलं की exactly काय करावं लागतं.

तर आता थोडं आमच्या नाटकाबद्दल. या वर्षी प्रथमच ३ तासाच्या नाटकात भाग घेतोय. आम्ही तरुण तुर्क म्हातारे अर्क बसवतोय. दर विकेंड ला आमची ७-११ प्रॅक्टिस असते. कधी कधी मलाच विश्वास बसत नाही की मी कुठेतरी ७ वाजता पोहोचायचा प्रयत्न करतो. हो, मी प्रयत्न करतो. ७ ला पोहोचत कधीच नाही. मला ते शक्यही नाही. मी आणि अमिता सोडून सगळे ७ ला पोहोचतात. मला खरच कौतूक वाटतं त्यांचं. माझा फ़क्त प्रयत्न अमिताच्या आधी पोहोचायचा असतो. आज तर कमालच झाली. ७.०० वाजता जाग आली, मग काय, जे व्हायच तेच झालं. आर्धा तास उशीर! असो, आता जवळपास बसत आलं आहे आमचं नाटक. आता फ़क्त २ आठवडे रहिले आहेत.