Sunday, December 23, 2007

कोल्हापुरी मिसळ

तसा माझा आणि तिखट जेवणाचा अजिबात संबंध नाही. माझा जन्म कोल्हापुरचा, तसेच मी ११ वर्ष पण कोल्हापुर मधे काढली पण तरीही तिखट जेवण मला काही पचत नाही. मी आपला वरण भात prefer करणारा. पण काल एकदम झणझणीत मिसळ खायचा mood झाला. मग काय, मिनोतीच्या ब्लॉग वरुन ही कृती उचलली आणि लागलो तयारीला!

आहाहा! झणझणीत कोल्हापुरी मिसळ! तूम्हालाही इच्छा झाली तर कृती इथे दिली आहे.

ही कृती मी मिनोतीच्या ब्लॉग वरून ढापली आहे! (पण फोटो नाही ढापलेला).

मटकीची उसळ -
४ वाट्या मोड आलेली मटकी
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ टेबल्स्पून तेल - फोडणीसाठी कढीलिंब आणि इतर फोडणीचे साहित्य
२ लहान लसुण पाकळ्या (आवडत असतील तर)
कांदा-लसुण मसाला - २ चमचे (आवडीप्रमाणे कमी जास्त करावे)
चवीप्रमाणे मीठ
थोडेसे पाणी - मटकी शिजवण्यापुरते

कृती - तेलाची नेहेमीप्रमाणे कढिलिंब घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यातच लसुण पाकळ्या ठेचुन टाकाव्यात. त्यावर चिरलेला कांदा मध्यम आचेवर परतवुन घ्यावा. त्यात मटकी घालुन ती पण नीट परतुन घ्यावी. त्यावर आता कांदा-लसुण मसाला, मीठ घालुन परतावे. साधरण १/२ कप पाणी घालुन झाकण ठेवुन मटकीची उसळ शिजवुन घ्यावी.

मिसळीचा कट -
२ मोठे लाल कांदे पातळ उभे चिरुन
२ चमचे लाल तिखट (लाल रंगाचे पण खुप तिखट नसलेले ब्याडगीचे वापरणार असाल तर २ चमचे अन्यथा चवीप्रमाणे कमी करावे)
चवीपमाणे मीठ
२ चमचे गरम मसाला
२ टेबल्स्पून कोरडे खोबरे
२ टेबलस्पून ओले खोबरे
३ टेबल्स्पून तेल
५-६ लसुण पाकळ्या
१/२ इंच आले
१/२ वाटी कोथिंबीर

कृती - १ चमचा तेल जाड बुडाच्या कढईत घालुन त्यावर कापलेल्यापैकी २/३ कांदा मंद आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतुन घ्यावा. त्यातच आल्याचे तुकडे, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, दोनही प्रकारचे खोबरे घालुन अजुन साधारण ३-४ मिनीटे परतुन घ्यावे. परतत असताना काहीही जळणार नाही ह्याची काळजी घ्यावी. थोडावेळ थंड करुन कमीत कमी पाणी वापरुन मसाला वाटुन घ्यावा. आता उरलेला कांदा २ चमचे तेलात फोडणी करुन परतुन घ्यावा. त्यावर लाल तिखट घालुन परतावे. तिखट घालुन परतताना घराच्या खिडक्या दारे उघडायला विसरु नये. त्यावर वाटलेला मसाला घालुन साधरण ५-७ मिनीटे व्यवस्थीत परतुन घ्यावे. त्यात गरम मसाला आणि मीठ घालुन साधरण ५-६ कप पाणी घालावे. गॅस बारीक करुन झाकण न ठेवता कट नीट उकळु द्यावा. असे केल्याने तेलाचा तवंग नीट येतो अगदी कमी तेल घातले तरी. उकळताना पाणी अटेल त्यापमाणे जस्ती घालावे. तयार कट ५-६ कप असावा.

मिसळीसाठी लागणारे इतर साहीत्य -
२ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन चिरुन
५-६ वाट्या फ़रसाण
१/२ वाटी कोथिंबीर
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ लिंबु फोडी करुन
६-८ ब्रेड स्लाईसेस

वाढण्याची रीत - एका पसरट बाऊल मधे साधरण १/२ कप उसळ घालावी. त्यावर १/२ कप फ़रसाण, त्यावर ५-६ बटाट्याच्या फोडी, साधारण १/२ कप कट, चमचाभर कांदा, चमचाभर कोथिंबीर घालावे. बरोबर २ ब्रेड स्लाईस आणि लिंबु द्यावे. खुप सारे Tissue papers द्यायला ही विसरु नये!!

टीप - हा पदार्थ खाउन कुणाला त्रास झाला तर मी जबाबदार नाही!!