Saturday, May 14, 2011

अप्रतिम अ‍ॅरिझोना


आज बरेच वर्षांनी ब्लॉग लिहायची परत ईच्छा झाली. २ आठवड्या पुर्वी मी अ‍ॅरिझोना ला सहलीला गेलो आणि मनात आलं की हे प्रवास वर्णन ब्लॉग वर जरूर लिहावं. ईंटरनेट वर बर्‍याच वेळा स्लॉट कॅनिअन बद्दल वाचलं होतं आणि बरीच उत्सुकता निर्माण झाली होती. थोडाफार अभ्यास केल आणि समजलं की उताह आणि अ‍ॅरिझोना च्या सिमेवर अप्रतीम स्लॉट कॅनिअन आहेत. जवळ जवळ १ वर्षात सहलीला गेलो नव्हतो आणि म्हंटल; होउन जाउ दे.

बुधवारी संध्याकाळी हा विचार डोक्यात आला. गुरुवारी साहेबाला १ दिवस सुट्टी मागितली आणि लगेच विकेंड चं विमानाचं तिकिट काढलं. प्लान असा होता की सोमवारी सुट्टी घ्यायची (२ मे २०११ ला). शनिवारी सकाळी सॅन होज्याहुन लास वेगस ला विमानने जायचं आणि तिथुन गाडीने जवळ जवळ ५ तासात पेज, अ‍ॅरिझोना या गावाला पोहोचायचं. पुढचे २ दिवस स्लॉट कॅनिअन मधे घालवुन परत. गुरुवारी सर्व बुकिंग करुन ट्रिपची तयाती तशी झाली होती.

शनिवारी सकाळी माझं विमान सॅन होज्याहुन सकाळी ६.२० ला होतं. मला खरचं कळत नाही की मला एवढ्या सकाळचं विमान बुक करायची का दुर्बुद्धी होते. या वेळी ठरवलं की काही नाही, या वेळी उशीर करायचा नाही. आश्चर्य म्हणजे मी लवकर उठून वेळेत तयार पण झालो पण टॅक्सी ने घोळ घातला. ४.४५ ला येणारी टेक्सी ५.२० ला आली. नेह्मी व्हायचं तेच झालं, विमानतळावर धावपळ. हे काही आता मला नविन रहिलेलं नाही. पण कसंबसं विमान पकडलं आणि लास वेगस ला सुटलो.

शांतपणे आता विमानात १ डूलकी काढायचा विचार होता आणि तेव्हा जाणवलं की मी कॅमेर्‍याची बॅटरी आणि चार्जर घरीच विसरलो आहे. नशिब, कॅमेरा आणि लेन्स बरोबर होत्या. म्हंटलं, जास्त विचार करायचा नाही; वेगस मधे गेल्यावर बघू.

वेळेप्रमाणे वेगस ला पोहोचलो, गाडी भाड्याने घेतली आणि सरळ Fry's गाठलं. लागणार्‍या बॅटरीज आणि चार्जर घेतले आणि पेज, अ‍ॅरिझोना कडे निघालो.

वेगस हून निघायला सकाळचे ११.३० झाले. साडे चार तासात मी पेज ला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर टूर कंपनीच्या मालकाशी थोड्या गप्पा मारल्या आणि काय काय बघायचं याचं प्लानिंग केलं. टूर मालक कल्ला होता आणि माझं कल्ल्यांशी फार छान जमतं. मला ती दिलखुलास माणसं वाटतात. त्याने मला सांगीतलं की आता संध्याकाळ होईल आणि मी हॉर्स बेंड शू बघायला जाणं उत्तम. मी सहसा कुठेही जातो तेव्हा स्थानिक लोकांशी गप्पा मारून माझे प्लान बनवतो.

वातावरण थोडं ढगाळ होतं पण तरीही हॉर्स शू बेंड बघायला जायचं ठरवलं. पेज पासुन हे ठिकाण काही फार लांब नाही. जवळपास १० मिनिटाचा ड्राईव्ह असेल. पार्किंग स्पॉट पासून मात्र १.२ किलोमिटर चा चढ चालून जावा लागतो. हे सर्व अंतर पार करून हॉर्सशू बेंड ला पोहोचलो आणि काळजात धस्सं झालं. जवळपास १००० फूट खोली आणि पुढे हॉर्सशू बेंड. आधीच मला उंचीची भिती आणि त्यात ईथे एकही कठडा नाही. जरा तोल गेला तर "अल्लाह को प्यारे". तरीही धीर धरून कड्यापर्यंत गेलो. जमिनीवर झोपलो आणि थोडा थोडा पुढे सरकू लागलो. कड्यावरून दिसणारे दृष्य मात्र अप्रतिम होते. माझे बघून आणि एकाने असाच प्रयत्न करून फोटो काढण्यास सुरवात केली.


मी तिथे पोहोचल्यावर वातावरण जास्त ढगाळ झाले. माझ्या मनात असलेला हॉर्सशू बेंड चा फोटो मी कॅमेर्‍यात नाही उतरवू शकलो पण एकूण हे ठीकाण खूप आवडलं. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास अंधार पडायला लागल्यावर परत निघायचं ठरवलं. परत पार्किंग लॉटला पोहोचायला अर्धा तास लागला. तिथून परत पेज ला आलो आणि सुपर ८ मोटेल मधे मुक्काम ठोकला. बराच थकलो होतो आणि ईटालियन खायचा मूड होता. ईथे जवळपास सगळी हॉटेल्स फॅमिली owned आहेत. Canyon King Pizzeria मधे जेवायला गेलो. थोडं महाग हॉटेल वाटलं पण पर्याय काही नव्हता. जेवण झालं आणि तडक रूम मधे जाउन crashed to bed.

रविवारी (१ मे २०११) सकाळी ६.३० ला उठलो आणि एका तासात आवरून ७.३० च्या सुमारास Lower Antelope Canyon ला निघालो. स्लॉट कॅनिअन चे २ भाग आहेत; लोवर आणि अप्पर. सकाळी ८ ते १० लोवर कॅनिअन मधे वेळ घालवायचा ठरवला. हा भाग पेज या गावापासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे. लोवर कॅनिअन साठी $२६ फी आहे आणि फक्त कॅश घेतली जाते. सर्व औपचारीकता पुर्ण करून ८.३० च्या सुमारास लोअर कॅनिअन मधे शिरलो.
डाविकडच्या फोटो मधे लोअर कॅनिअन चा प्रवेश दिसतोय. पाउस, उन आणि वारा यांच्या मुळे जमिनिची झीज होउन हे नैसर्गिक अविष्कार निर्माण झाले आहेत.

जिना आणि खाचांचा आधार घेत लोअर कॅनिअन मधे शिरलो. या कॅनिअन मधे आनंद लुटायचा असेल तर शारिरीक दृष्ट्या तूम्ही सक्षम असणं नक्कीच गरजेचं आहे. सकाळी ८.३० च्या सुमारास अजिबात गर्दी नव्हती. तिथे आलेले सर्व लोक फोटोग्राफर होते त्यामूळे छान ग्रुप जमला. कॅनिअन मधे शिरल्यावर मात्र माझ्यातील लहान मूल पटकन जागृत झालं. एक दोनदा खरचट्ल्यावर जाणिव झाली की गडबड करणं योग्य नाही. ट्रायपॉड काढला, माझा कॅमेरा सेट केला आणि मग काय; सुरेख फोटोंची मेजवानीच मिळाली.

ईथे फोटो काढणं फार अवघड आहे. Lot of light reflection and difficult places to set the equipment adds challage to taking good photos.
पण काही फोटोग्राफर्स नी मला खरचं खूप मदत केली. त्यांनी मला सांगीतलं की अशा जागी फोकस कसा करायचा, कोणती सेटींग ठेवायची. काही फ्रेम पण त्यांनी सुचवल्या. असं वाटत होतं की ही जागा फक्त फोटोग्राफ्रर्स साठीच राखीव आहे. फोटो काढण्याची हौस असेल तर ही जागा खरचं चुकवू नका. इथे १.३० तास कसा गेला समजलच् नही. १०.३० ला मी अप्पर कॅनिअन चे रिझर्वेशन केलं होतं त्यामुळे मला हा कॅनिअन अर्धवट सोडून निघावं लागलं. १०.१५ च्या सुमारास टूर ऑफीसला पोहोचलो. अप्पर कॅनिअन हा टूर कंपनी तर्फेच बघावा लागतो. रोज सकाळी फोटोग्राफर साठी खास टूर असते १०.३० ला. ही टूर २.३० तासची असते आणि काही जागा या टूर साठी आऱक्षीत आहेत. त्याबद्दल पुढे सांगेनच.

अप्पर कॅनिअन साठी पक्का रस्ता नाही आहे. पेज पासून जवळपास ३० मिनिटांच्या अंतरावर ही जागा आहे. या साठी विशिष्ठ गाड्यांची सोय टूर कंपन्या करतात. फोटोग्राफर टूर मधे १०/१२ लोकांची क्षमता असते.

१०.३० च्या सुमारास आमची टूर निघाली. ११ च्या सुमारास आम्ही अप्पर कॅनिअन ला जवळपास पोहोचलोच होतो आणि आमची गाडी मातीत अडकली. उतरून धक्का मारायचा प्रयत्न केला पण गाडी जागची हालेना. शेवटी, ड्रायव्हर ने सांगीतले की पुढचे अंतर चालत जाउ. टूर संपेपर्यंत कोणितरी गाडीची सोय करेल. या सर्व दिव्यातून पार पडत आम्ही अप्पर कॅनिअन मधे पोहोचलो. हा भाग जरा जास्त गजबजलेला होता. ईथे कोणताही चढउतार नसल्याने सर्व वयोगटाती लोकं दिसत होती. पण एकूणच युरोप आणि जपानच्या लोकांचा जास्त प्रभाव होता. देशी बांधव कोणीच दिसले नाही.

अप्पर कॅनिअन चे मुख्य आकर्षण म्हणजे १२ च्या सुमारास कॅनिअन मधे येणारा सुर्याचा किरण.


फक्त फोटोग्राफी टूर मधल्या लोकांना १२ च्या सूमारास एका विशिष्ठ जागी प्रवेश दिला जातो. आम्ही ५ ते ६ फोटोग्राफर एका कोपर्‍यात या सुर्यकिरणाची वाट बघत होतो. आणि १२ च्या सुमारास जे दृष्य दिसले ते शब्दात वर्णन करणे खरच् अवघड आहे. हा सुर्याचा किरण जवळपास ५ ते ७ मिनिट रहातो. दर वर्षी एप्रिल ते ऑगस्ट च्या दरम्यान हा निसर्गाविष्कार घडतो. फोटोग्राफी टूर जवळपास १ महीन्या आधीच भरते त्यामूळे advanced reservation आवष्यक आहे.

आमच्या ट्रिप चा गाईड आणि माझं छान जमलं होतं. त्याने प्रत्येक वेळी मला फोटो काढण्यासाठी मोक्याची जागा दिली. त्यामुळेच एकाही फोटोमध्ये कोणिही टूरिस्ट आले नाही. त्याच प्रमाणे वेगवेगळे फोटो ईफेक्ट यावे यासाठी तो खूप प्रयत्न करत होता.

डाविकडच्या फोटोसाठी त्याने स्वतः माती उचलून या खडकांवर टाकली होती.
दिडच्या सुमारास आमची सहल पुर्ण झाली आणि आम्ही परत पेज ला निघालो. एव्हाना कंपनीने दुसर्‍या गाडीची सोय केली होती. परतीचा प्रवास मात्र सुरळीत पार पडला. आता पेज मधल्या सगळ्या जागा बघून झाल्या होत्या आणि निम्मा दिवस हातात होता. काय करावं हा विचार करत होतो. त्याचवेळी लक्षात आलं की मॉन्यूमेंट व्हॅली ईथून काही जास्त लांब नव्हती. २ तासाच्या आसपासचा प्रवास होता. पटकन टॅको बेल मधे जेउन घेतलं आणि मॉन्यूमेंट व्हॅली ला निघालो.

मॉन्यूमेंट व्हॅली मधे बर्‍याच चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती त्यामुळे बरेच experiment करू शकलो.
एक सल्ला: जर मॉन्युमेंट व्हॅलीला जाणार असाल तर सकाळी जाणे उत्तम. चांगल्या फोटोसाठी १ हेझ फिल्टर नक्की बरोबर ठेवा. वरील फोटो संध्याकाळी हेझ फिल्टर शिवाय काढला आहे.

इथुन आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला. १ तास मॉन्युमेंट व्हॅली मधे घालवून मी परत पेज ला पोहोचलो. रात्री मुक्काम बेस्ट वेस्टर्न मधे ठोकला. सकाळी उठून परत विचार आला की थोडा वेळ लोअर कॅनिअन मधे घालवावा. ९ च्या सुमारास परत लोअर कॅनिअन ला गेलो आणि ३ तास तिथे कसे गेले ते समजलेच नाही.

माझा कॅमेरा रंगांशी खेळत होता म्हंटलं तर वावगं ठरू नये. हि सकाळ खरचं फार छान गेली. १२.३० च्या सुमारास जाणीव झाली की आता निघायला हवं. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतोच. पाय निघत नव्ह्ता पण दूसरा पर्यायही नव्हता. पेज ला परत येउन; जेउन दुपारी २.३० च्या सुमारास वेगस ला निघालो. आता वेगस चे वेध लागले होते ;). कोठेही न थांबता ४ तासात वेगस ला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ ला विमान होतं (अरे देवा...). नेहमी प्रमाणे सकाळी उठायला उशीर, थोडसं उशीरा विमानतळावर पोहोचणं, सर्व स्टाफ च्या हातापाया पडून कसबसं विमान गाठण्याचे सोपस्कार पार पाडून सॅन फ्रान्सिस्कोला सुटलो. वेगस हून SF ला १.३० तासत पोहोचलो पण SF हून Sunnyvale ला पोहोचायला २ तास लागले. Morning commute hours are really PIA.

पण एकुणच्, फार छान सहल झाली. अचानक ठरवलं आणि नेह्मीच्या चिंता बाजूला ठेउन झक्कास विकेंड ऐंजॉय केला.