
आहाहा! झणझणीत कोल्हापुरी मिसळ! तूम्हालाही इच्छा झाली तर कृती इथे दिली आहे.
ही कृती मी मिनोतीच्या ब्लॉग वरून ढापली आहे! (पण फोटो नाही ढापलेला).
मटकीची उसळ -
४ वाट्या मोड आलेली मटकी
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ टेबल्स्पून तेल - फोडणीसाठी कढीलिंब आणि इतर फोडणीचे साहित्य
२ लहान लसुण पाकळ्या (आवडत असतील तर)
कांदा-लसुण मसाला - २ चमचे (आवडीप्रमाणे कमी जास्त करावे)
चवीप्रमाणे मीठ
थोडेसे पाणी - मटकी शिजवण्यापुरते
कृती - तेलाची नेहेमीप्रमाणे कढिलिंब घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यातच लसुण पाकळ्या ठेचुन टाकाव्यात. त्यावर चिरलेला कांदा मध्यम आचेवर परतवुन घ्यावा. त्यात मटकी घालुन ती पण नीट परतुन घ्यावी. त्यावर आता कांदा-लसुण मसाला, मीठ घालुन परतावे. साधरण १/२ कप पाणी घालुन झाकण ठेवुन मटकीची उसळ शिजवुन घ्यावी.
मिसळीचा कट -
२ मोठे लाल कांदे पातळ उभे चिरुन
२ चमचे लाल तिखट (लाल रंगाचे पण खुप तिखट नसलेले ब्याडगीचे वापरणार असाल तर २ चमचे अन्यथा चवीप्रमाणे कमी करावे)
चवीपमाणे मीठ
२ चमचे गरम मसाला
२ टेबल्स्पून कोरडे खोबरे
२ टेबलस्पून ओले खोबरे
३ टेबल्स्पून तेल
५-६ लसुण पाकळ्या
१/२ इंच आले
१/२ वाटी कोथिंबीर
कृती - १ चमचा तेल जाड बुडाच्या कढईत घालुन त्यावर कापलेल्यापैकी २/३ कांदा मंद आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतुन घ्यावा. त्यातच आल्याचे तुकडे, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, दोनही प्रकारचे खोबरे घालुन अजुन साधारण ३-४ मिनीटे परतुन घ्यावे. परतत असताना काहीही जळणार नाही ह्याची काळजी घ्यावी. थोडावेळ थंड करुन कमीत कमी पाणी वापरुन मसाला वाटुन घ्यावा. आता उरलेला कांदा २ चमचे तेलात फोडणी करुन परतुन घ्यावा. त्यावर लाल तिखट घालुन परतावे. तिखट घालुन परतताना घराच्या खिडक्या दारे उघडायला विसरु नये. त्यावर वाटलेला मसाला घालुन साधरण ५-७ मिनीटे व्यवस्थीत परतुन घ्यावे. त्यात गरम मसाला आणि मीठ घालुन साधरण ५-६ कप पाणी घालावे. गॅस बारीक करुन झाकण न ठेवता कट नीट उकळु द्यावा. असे केल्याने तेलाचा तवंग नीट येतो अगदी कमी तेल घातले तरी. उकळताना पाणी अटेल त्यापमाणे जस्ती घालावे. तयार कट ५-६ कप असावा.
मिसळीसाठी लागणारे इतर साहीत्य -
२ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन चिरुन
५-६ वाट्या फ़रसाण
१/२ वाटी कोथिंबीर
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ लिंबु फोडी करुन
६-८ ब्रेड स्लाईसेस
वाढण्याची रीत - एका पसरट बाऊल मधे साधरण १/२ कप उसळ घालावी. त्यावर १/२ कप फ़रसाण, त्यावर ५-६ बटाट्याच्या फोडी, साधारण १/२ कप कट, चमचाभर कांदा, चमचाभर कोथिंबीर घालावे. बरोबर २ ब्रेड स्लाईस आणि लिंबु द्यावे. खुप सारे Tissue papers द्यायला ही विसरु नये!!
टीप - हा पदार्थ खाउन कुणाला त्रास झाला तर मी जबाबदार नाही!!
No comments:
Post a Comment